फोटो ओळ:महाराष्ट्र व मुंबई प्रदेश काँग्रेस अनुसूचित जाती विभागाच्या अंतर्गत एक लाख संविधान प्रति वितरण शुभारंभ व संविधान गौरव सोहळा दादर येथे पार पडला. यावेळी महाराष्ट्र काँग्रेस अध्यक्ष नाना पटोले, ऑल इंडिया काँग्रेस ओबीसी, एससी, एसटी मायनोरिटीचे समन्वयक के. राजू, ऑल इंडिया काँग्रेस एससी विभागाचे अध्यक्ष डॉ. राजेश लिलोठिया, मुंबई प्रदेश काँग्रेस अध्यक्षा प्रा. वर्षा गायकवाड, मुंबई काँग्रेस अनुसूचित जाती विभागाचे अध्यक्ष कचरू यादव, महाराष्ट्र काँग्रेस अनुसूचित जाती विभागाचे अध्यक्ष सिद्धार्थ हत्तीअंबिरे, इतर काँग्रेस नेते व पदाधिकारी यांची उपस्थिती होती.
- प्रा. वर्षा गायकवाड यांनी मोदी सरकारवर साधला निशाणा
- संविधान प्रती वितरण व संविधान गौरव सोहळा उत्साहात संपन्न
मुंबई – देशाच्या संविधानाला वाचविण्यासाठी काँग्रेस पक्ष मैदानात उतरला आहे. देशाचं संविधान जुनं झालं आहे, ते बदललं पाहिजे, अशी भूमिका सरकार घेत आहे. या सगळ्यांना उत्तर द्यायचं असेल तर आपल्याला घराघरात संविधान पोहोचविणे गरजेचे आहे. तसेच देशाच्या संसदेतही संविधानाची मायमल्ली केली जातेय. आताचं राजकारण हे जाती-पातीचं होत चाललं आहे. येणाऱ्या काळात ही लढाई देशाची व जनतेची असेल, असे प्रतिपादन मुंबई काँग्रेस कमिटीच्या अध्यक्षा प्रा. वर्षा गायकवाड यांनी केले.
महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस अनुसुचित जाती विभाग व मुंबई काँग्रेस अनुसूचित जाती विभागाच्या वतीने संविधान गौरव सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. दादर पूर्वेकडील हिंदू कॉलनी येथील राजगृहाजवळील राजा शिवाजी विद्यालयातील बी. एम. वैद्य सभागृहात संविधान दिवस कार्यक्रम रविवारी पार पडला. यावेळी एक लाख संविधान प्रतींच्या वितरणाची सुरूवात करण्यात आली. यावेळी, छोटेखानी संविधान पहाट हा कार्यक्रम पार पडला. यात संविधानावर आधारित गीत व गाणी आणि भीमरायाची गाणी गायिली गेली. तसेच संविधानाचे वाचन ही करण्यात आले.

वर्षा गायकडवाड म्हणाल्या की, सध्या देशात हुकुमशाही आहे. दोन वर्ष झाली एकाही योजनेची व्यवस्थित अंमलबजावणी किंवा आढावा घेतलेला नाही. मुलांना शिष्यवृत्ती दिली जात नाही. सरकारी शाळा बंद केल्या जात आहे. जनतेला सरकारने काहीही दिलेले नाही, त्यामुळे आता रस्त्यावर उतरून आपल्या हक्कासाठी आंदोलने व मोर्चे काढावे लागतील. संविधान घराघरात पोहवून क्रांती घडवावी लागेल. लोकशाहीमध्ये लढाई ही खूप गरजेची आहे. ती लोकशाही डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दिली आहे. आज आपण बाबासाहेबांच्यामुळे इथे आहोत, असेही त्या म्हणाल्या.
संविधान वाचविण्यासाठी सगळ्यांना एकजुटीनं लढावं लागणार आहे. ८० कोटी लोकांना मोफत धान्य दिलं जातंय. देशाची १४० कोटी लोकसंख्या आहे. यावरून देशाची गरिबी किती वाढत आहे, हे लक्षात येते. मोदी सरकार जनतेला गरीबीच्या वाटेवर नेत आहे. मोदी सरकारने जीएसटी आणून गरीबांच्या खिशातले पैसे काढले आणि मोदींनी ते पैसे उद्योगपती मित्रांच्या तिजोरीत टाकले. आता गरीबांच्या मुलांना शिक्षण घेणे कठीण झालं आहे. संविधान जनजागृतीच्या माध्यमातून सर्वांमध्ये जागृती निर्माण व्हावी, यासाठी काँग्रेस पक्षाकडून महाराष्ट्रासह देशभरात वाटचाल सुरू झाली आहे, असे महाराष्ट्र काँग्रेस अध्यक्ष नाना पटोले यांनी सांगितले.

संविधानाची रक्षा करणे आणि संविधान टिकवणे, ही सर्वांची जबाबदारी आहे. संविधानातील पान फाडण्याचे काम आरएसएसची लोक करत आहेत. मोदी सरकारने मीडियाला आपल्या मुठीत ठेवले आहे. आपली देशाच्या संविधानाला वाचविण्याची जबाबदारी आहे. संविधान संपलं तर आपलं जगणं कठीण होऊन जाईल, अशी माहिती ऑल इंडिया काँग्रेस एससी विभागाचे अध्यक्ष डॉ. राजेश लिलोठिया यांनी दिली.
संविधान धोक्यात का आहे? यामागची कारण जाणून घेतली पाहिजे. आरएसएसने संविधानाविरुध्द मोहिम सुरू केली आहे. भाजप सरकार संविधानाला संपविण्याचे षडयंत्र रचत आहे. जोपर्यंत संविधान देशात आहे, तोपर्यंत देश हिंदुराष्ट्र बनणार नाही, अशी माहिती ऑल इंडिया काँग्रेस ओबीसी, एससी, एसटी मायनोरिटीचे समन्वयक के राजू यांनी दिली.

याप्रसंगी, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस अनुसुचित जाती विभाग अध्यक्ष सिद्धार्थ हत्तीअंबीरे, मुंबई काँग्रेस अनुसुचित जाती विभागाचे अध्यक्ष कचरू यादव, प्रवक्ते राजू वाघमारे, काँग्रेस नेते महेंद्र मुणगेकर, तुषार गायकवाड, महिला काँग्रेस अध्यक्षा अंजता यादव व युवराज मोहिते यांच्यासह इतर काँग्रेस नेते व पदाधिकाऱ्यांची उपस्थिती होती.
चौकट
संविधान दिंडी
डॉ. बाबासाहेब आंबेडकर ज्या घरात राहत होते त्या राजगृहात जाऊन बाबासाहेबांच्या फोटोला अभिवादन करण्यात आले. त्यानंतर ढोल ताशाच्या गजरात संविधान दिंडी राजगृहापासून ते बी. एम. वैद्य सभागृहापर्यंत काढण्यात आली. यावेळी, वारकरी सांप्रदाय पध्दतीने संविधान दिंडी उत्साहात काढली गेली. हाती टाळ व मृदुंगाच्या तालावर नाचत-गाजत संविधान पालखी बी. एम. वैद्य सभागृहाकडे निघाली. तसेच भांगडा वाद्य देखील वाजविण्यात आले.
२६/११ च्या दहशतवादी हल्ल्यातील शहिदांना आदरांजली
काँग्रेस नेत्यांच्यावतीने २६/११ च्या दहशतवादी हल्ल्यात शहीद शुरविरांना आदरांजली वाहण्यात आली. या दहशतवादी हल्ल्याला १५ वर्ष पुर्ण झाली असून अजूनही ती जखम प्रत्येक मुंबईकरांच्या मनात ताजी आहे. यावेळी ‘शहीद जवान, अमर रहे’ चा नारा देण्यात आला.