आ. वर्षा गायकवाड यांचा सरकारला इशारा
- राज्यभरात डॉक्टरांचा रुग्णांच्या जीवाशी खेळ
एकीकडे सरकारी रुग्णालयांमधील दुरावस्थेचा प्रश्न बिकट होत चालला असताना दुसऱ्या बाजूला राज्यभरात योग्य पदवी न घेता प्रॅक्टिस करणाऱ्या डॉक्टरांचा सुळसुळाटही चिंताजनक आहे. कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी नसलेले हे डॉक्टर रुग्णांच्या जीवाशी खेळत असून याविरोधात सरकार नेमकं काय धोरण आखणार, असा सवाल आ. वर्षा गायकवाड यांनी उपस्थित केला. या बनावट पदवीधारक डॉक्टरांविरोधात राज्य सरकारने धोरण तयार करावे, अशी मागणीही त्यांनी केली.
मुंबईसारख्या शहरांमध्ये अनेक डॉक्टर परदेशातील विद्यापीठांमधून पदव्या घेतल्याचा दावा करत प्रॅक्टिस करत आहेत. ही विद्यापीठे मान्यताप्राप्त आहेत अथवा नाहीत, त्यांनी नेमकी कोणत्या प्रकारात पदवी घेतली आहे, याबाबतची कोणतीही माहिती नसते. अशा डॉक्टरांनी चुकीचे निदान केल्याने अथवा चुकीचे औषधोपचार केल्याने अनेक रुग्ण दगावण्याच्या घटनाही घडल्या आहेत. त्यामुळे अशा डॉक्टरांना प्रॅक्टिस करण्यापासून थांबवण्याची गरज आ. वर्षा गायकवाड यांनी हिवाळी अधिवेशनात बोलून दाखवली.
या डॉक्टरांविरोधात तक्रार केली, तरी ते न्यायालयात जाऊन स्थगिती घेऊन येतात. त्यामुळे अशा डॉक्टरांना पदवी देऊन सामान्य नागरिकांच्या जीवाशी खेळण्याचं काम सुरू असल्याचा आरोपही आ. गायकवाड यांनी केला. रुग्णांचे नाहक बळी जाऊ नयेत, कोणत्याची चुकीच्या पद्धतीने डॉक्टरांनी प्रॅक्टिस करू नये, यासाठी धोरणात्मक नियम तयार करा, अशी मागणीही त्यांनी केली.
वैद्यकीय शिक्षण मंत्री व विशेष सहाय्य मंत्री हसन मुश्रीफ उत्तर देताना म्हणाले की, परदेशातून एमबीबीएस किंवा पदवी परीक्षा घेऊन आल्यानंतर आमच्याकडे नोंदणी न करता सराव करणाऱ्यांचा हा प्रश्न आहे. आतापर्यंत देशात असे २३ बोगस डॉक्टर आढळले होते. त्यापैकी आपल्याकडे ३ इतके होते. त्यांच्यावर आता कायदेशीर कारवाई चालू आहे. व सल्लागारांचे मत घेऊन त्यांची पदवी थांबवण्याचा निर्णय घेऊ.
बार्टीच्या विद्यार्थ्यांना तातडीने शिष्यवृत्ती द्या!
- आ. वर्षा गायकवाड यांची अधिवेशनात मागणी
- विद्यार्थ्यांकडे सरकारचं दुर्लक्ष होत असल्याचा आरोप
अनुसूचित जातींमधील विद्यार्थ्यांसाठी असलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था म्हणजेच बार्टीच्या पीएच.डी. धारक संशोधकांना अजूनही शिष्यवृत्ती मिळाली नसल्याचा मुद्दा आ. वर्षा गायकवाड यांनी हिवाळी अधिवेशनात मांडला. शिष्यवृत्तीची रक्कम न मिळाल्याने या विद्यार्थ्यांची अत्यंत गैरसोय होत असून सरकार या विद्यार्थ्यांकडे दुर्लक्ष करत आहे का, असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला.
अनुसूचित जातींमधील विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणाच्या सर्व सुविधा उपलब्ध व्हाव्यात, यासाठी बार्टीची स्थापना झाली. या बार्टीच्या धर्तीवरच सारथी आणि महाज्योती या संस्था सुरू झाल्या. मात्र महाज्योती या संस्थेच्या माध्यमातून १२२६ मागासवर्गीय पीएच.डी. धारकांना आणि सारथीच्या माध्यमातून मराठा समाजातील ८५१ विद्यार्थ्यांना सरसकट शिष्यवृत्ती मिळाली. पण बार्टीच्या अखत्यारीत येणारे संशोधक अद्यापही शिष्यवृत्तीपासून वंचित आहेत.
बार्टीचे विध्यार्थी पुण्याच्या बार्टी ऑफिसला उपोषण करत आहेत, २४ डिसेंबर रोजी असणारी परीक्षा रद्द करून योग्य नोंदणी आणि कागदपत्रांची पडताळणी करून, त्यांना शैक्षणिक प्रमाणपत्र आणि शिष्यवृत्तीची रक्कम त्वरित देण्याची मागणी प्रा. वर्षा गायकवाड यांनी केली.
तसेच शिष्यवृत्ती देण्याबाबतचा निर्णय फक्त सारथी आणि महाज्योती या संस्थांच्या विद्यार्थ्यांसाठी घेण्यात आला आहे तो बार्टीच्या विद्यार्थ्यांसाठी देखील घेण्यात यावा आणि आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांची सरकारने भेट घेऊन त्यांच्यासाठी योग्य निर्णय घ्यावा, अशी मागणी प्रा. वर्षा गायकवाड यांनी केली.