मुंबई : नागरिकांमध्ये संविधानिक हक्कांची जाणिव दिवसेंदिवस प्रबळ होत असल्यामुळे राज्यभर जनसामान्यांचा प्रक्षोभ उफाळून येत आहे. सामान्य जनमाणसांच्या या प्रक्षोभनातूनच “लोकांनी, लोकांसाठी, लोकांकडून चालवला जाणारा “लोकराज्य पक्ष” उदयाला आलेला असून लोकसभेसाठी सर्व जागा लढवणार असल्याची माहिती लोकराज्य पार्टीचे अध्यक्ष सखाराम बिऱ्हाडे यांनी मुंबई मराठी पत्रकार संघ येथे आयोजित पत्रकार परिषदेत दिली.
यावेळी बिऱ्हाडे म्हणाले, लोकहितांच्या कामापेक्षा सत्ता टिकवण्यात सरकारचा प्रचंड वेळ जात असल्यामुळे जनतेची कामे कुणी करावी ? असा प्रश्न जनतेला पडला आहे. सरकारने वर्षानुवर्षे अनेक जाती जमातींचे सामाजिक प्रश्न न सोडवल्यामुळे आदिवासी कोळी जमाती, धनगर, मराठा, भिल्ल, मन्नेरवारलू, ठाकर, ठाकूर, हलबा, माना या जाती जमातींसह तळागाळातील अनेक लहान मोठ्या जातीजमाती संविधानिक हक्क, अधिकार व लाभ मिळत नसल्यामुळे स्वातंत्र्यानंतरही शैक्षणिक आर्थीक आद्योगिक व सामाजिक विकास न झाल्यामुळे जनता आंदोलन करून उद्रेक करत आहे.
पार्टीचे महासचिव ॲड किशोर दिवेकर म्हणाले, शेतकरी, कामगार, कष्टकरी, बेरोजगार यांच्या ज्वलंत प्रश्नांसोबतच शैक्षणिक , कृषी, औदयोगिक व मत्स्योद्योग धोरणांचाही बोजवारा उडाल्यामुळे अनेक प्रश्न निर्माण झालेले आहेत.
महागाईने तर कळस गाठलेला आहे. शासनाच्या चुकीच्या धोरणांमुळे पुन्हा संविधानाच्या अधीन राहून विकासाचीच नेमकी परिभाषा करण्याची व शिकवण्याची वेळ जनतेवर आलेली आहे.
महाराष्ट्रातील प्रस्थापीत पक्षांच्या कोणत्याही नेत्यांना जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी वेळ व आस्था नसल्यामुळे, तसेच त्यांना अत्यावश्यक लोकाभिमुख जीवनावश्यक कार्य करायचे नसल्यामुळे सगळीकडे अराजकता मजली असल्याने लोकराज्य पार्टी आता लोकसभेच्या मैदानात सर्वच्या सर्व जागा लढवणार असल्याचे सखाराम बिऱ्हाडे यांनी यावेळी सांगितले.
“अनुसूचित जाती व जमाती, इतर मागासवर्ग, विस्तारीत क्षेत्रातील अन्यायग्रस्त जमाती, बहूजन शेतकरी, कष्टकरी, कामगार आता लोकसभेत व विधानसभेत पाठवून संविधानिक तरतुदींच्या चौकटीत राहून नागरीकांसाठी जीवनावश्यक लोकाभिमुख कामे प्राधान्याने करणे हा लोकराज्य पक्षाचा मुख्य अजेंडा आहे.असे ॲड किशोर दिवेकर यांनी यावेळी सांगितले.