- आ. सत्यजीत तांबे यांची सभागृहात मागणी
- अरबी समुद्रातील स्मारकासारखं फक्त भूमिपूजन नको!
- मुंबई:छत्रपती शिवाजी महाराज हे मराठा साम्राज्याचे संस्थापक व आदर्श राजा होते. त्यांनी गमिनी कावा तंत्राचा वापर करून अनेक गडकिल्ले जिंकले. परंतु, सध्या हेच गडकिल्ले शेवटची घटका मोजत आहेत. यंदाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात किल्ले शिवनेरी येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाची घोषणा करण्यात आली. परंतु, अरबी समुद्रात होणाऱ्या स्मारकाचे थाटामाटात भूमिपूजन होऊनही अद्याप बांधकाम सुरू झालेले नाही, तसं किल्ले शिवनेरीवर होणाऱ्या आंतरराष्ट्रीय स्मारकाबाबत होऊ नये, अशी खंत आमदार सत्यजीत तांबे यांनी सभागृहात व्यक्त केली.
छत्रपती शिवाजी महाराजांनी शक्तीपेक्षा युक्तीचा वापर करून अनेक बलाढ्य शत्रुंचा पराभव केला. छत्रपती शिवाजी महाराजांचा हा इतिहास येणाऱ्या पिढीला समजावा, यासाठी गडकिल्ल्यांचे संवर्धन व स्मारके उभारली पाहिजे. प्रत्येक वेळी गडकिल्ल्यांचे संवर्धनाबाबत आपण चर्चा करतो, बोलतो, पण आजवर आपण प्रत्यक्षात एकही गडकिल्ला आदर्शवत करू शकलो नाही, ही खरी शोकांतिका आहे, असेही त्यांना सभागृहात नमुद केले.
छत्रपती शिवाजी महाराज हे उत्तम व्यवस्थापक होते. तसेच महाराजाचं प्रशासन चांगल्या पद्धतीने चालणारं होतं. तर ‘यशदा’ ज्या पद्धतीने प्रशासकीय कर्मचाऱ्यांना प्रशिक्षणाचं काम करते. त्याचं पद्धतीने छत्रपती शिवाजी महाराजांच्या व्यवस्थापन कौशल्यावर शासकीय कर्मचाऱ्यांसाठी प्रशिक्षण देणारी संस्था सुरू करावी, अशीही मागणी आमदार सत्यजीत तांबे यांनी सभागृहात केली.