- आमदार सत्यजीत तांबे यांनी केली मागणी
- राज्य शासनाने पालक व शिक्षकांच्या समस्या वाढविल्या!
अर्थसंकल्पीय अधिवेशनात आमदार सत्यजीत तांबे यांनी पूर्व प्राथमिक ते चौथीपर्यंतच्या शाळा या सकाळी ९ वाजता किंवा त्यानंतर भरवण्याचे आदेश राज्य शासनाने दिले आहेत. यावर आ. तांबेंनी सभागृहात मुद्दा उपस्थित करून सर्वांचे लक्ष वेधून घेतले. मुळात शाळा चालवणं, वेळापत्रक ठरवणं इत्यादी सुचना राज्य शासनाने देणं गरजेचं आहे. परंतु, शाळेची पहिली घंटा कधी वाजवायची? याचा निर्णय हा शालेय व्यवस्थापन समितीला असला पाहिजे, अशी मागणी आमदार सत्यजीत तांबे यांनी सभागृहात केली.
ऐनवेळी राज्य शासनाने शाळेच्या वेळेत बदल करून पालक व शिक्षकांच्या समस्या वाढविल्या आहेत. पालकांना आपल्या पाल्यांना शाळेत सोडण्यासाठी कामाच्या वेळेत बदल केलेला असतो. परंतु, आता शाळा सकाळी ९ वाजता भरणार, तर मुलांना शाळेत सोडण्यासाठी पालकांना तारेवरची कसरत करावी लागणार आहे. त्यामुळे राज्य शासनाने घेतलेल्या निर्णयामुळे पालकांची व शिक्षकांची अवस्था बिकट झाली आहे. तसेच स्कूलबस चालकांपुढे ही मोठा प्रश्न उपस्थित झाला आहे, असेही आ. तांबे यांनी सभागृहात स्पष्ट केले.
राज्यातील ७० टक्के शाळा या सकाळ व दुपार अशा दोन सत्रामध्ये सुरू असतात. परंतु, पूर्व प्राथमिक ते चौथीपर्यंतच्या शाळा सकाळी ९ नंतर सुरू करण्याच्या निर्णयामुळे अनेक प्रश्न निर्माण होऊ शकतात. शाळा कधी भरायची? व शाळेचे वेळापत्रक ठरविण्याचा अधिकार हा शालेय व्यवस्थापन समितीला किंवा तिथल्या स्थानिक शालेय व्यवस्थापनेला असला पाहिजे. राज्य शासनाने राज्यातील शाळा सकाळी ९ नंतर भरविण्याची सक्ती न करता, त्यामध्ये लवचिकता ठेवावी. याबाबतचे अधिकार शालेय व्यवस्थापन समितीला द्यावा, अशीही मागणी आ. तांबेंनी केली.