ठाणे – आठ वर्षांपूर्वी मुंब्रा – कौसा भागातील सर्व टीएमटी थांबे हटविण्यात आले होते. अद्यापही ते बसविण्यात आलेले नाहीत. त्यामुळे प्रवाशांना उन्हा – पावसात उभे रहावे लागते. याबाबत अनेकवेळा पत्रव्यवहार करूनही शेड तथा बस थांबे उभारले जात नसल्याने अखिल भारतीय दिव्यांग सेनेचे निमंत्रक मोहम्मद यूसुफ मोहम्मद फारुक खान यांच्या नेतृत्वाखाली नवीन वर्षात भिक मांगो आंदोलन करून त्या पैशातून बस थांबे उभारण्यात येणार आहेत.
खान यांनी यासंदर्भात टीएमटीच्या व्यवस्थापकांना पत्र दिले आहे. त्यांनी दिलेल्या पत्रानुसार, मुंब्रा – कौसा भागात काही वर्षांपूर्वी रस्ता रुंदीकरण करण्यात आले होते. या रुंदीकरणादरम्यान रस्त्यावर असलेले सुमारे 22 बसथांबे हटविण्यात आले होते. रस्ता रुंदीकरण झाल्यानंतर ते पूर्ववत करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले होते. मात्र, आठ वर्ष उलटल्यानंतरही या ठिकाणी बसथांबे बांधण्यात आलेले नाहीत. एक खांब जमिनीत रोवून त्यास बसथांब्याचे नाव देण्यात आलेले आहे. त्यामुळे प्रवाशांना उन्हात तसेच पावसात उभे राहून टीएमटी बसची वाट पहावी लागत आहे. या संदर्भात पत्रव्यवहार करण्यात आला होता. मात्र, टीएमटी प्रशासनाने सकारात्मक प्रतिसाद न दिल्याने अखिल भारतीय दिव्यांग सेनेने भिक मांगो आंदोलनाचा इशारा दिला होता. त्यावर आंदोलन स्थगित करावे, बस थांबे उभारतो, असे कळविण्यात आले होते. मात्र, या आश्वासनासही एक वर्ष उलटून गेले आहे. त्यामुळे आता पंधरा दिवसात जर शेड असलेले बस थांबे उभारले नाहीत तर एक जानेवारी 2025 पासून भिक मांगो आंदोलन करून त्यातून जमा झालेल्या पैशातून बस थांब्यावर शेड उभारण्यात येईल, असे खान यांनी सांगितले.