- गोरेगाव स्पोर्ट्स क्लब येथे राजस्थानचे मुख्यमंत्री भजनलाल शर्मा यांचा सत्कार समारंभ
मुंबई : उत्तर मुंबईचा विकास झपाट्याने होत आहे. “उत्तर मुंबई ही उत्तम मुंबई” बनवण्याचा दृढ संकल्प महायुतीने केला आहे. या भागातील लोकांना प्रगत जीवनशैली, चांगल्या सुविधा आणि रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी आमच्याकडे मास्टर प्लान तयार आहे, असे प्रतिपादन केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांनी केले.
मालाड पश्चिमेकडील गोरेगाव स्पोर्ट्स क्लब येथे शनिवारी राजस्थानचे मुख्यमंत्री भजनलाल शर्मा यांचा सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला होता. यावेळी पीयूष गोयल बोलत होते. याप्रसंगी, राजस्थानचे मुख्यमंत्री भजन लाल शर्मा, कॅबिनेट मंत्री शाहनवाज हुसैन, माजी खासदार गोपाळ शेट्टी, उमेदवार विनोद शेलार, आमदार विद्या ठाकूर, सेलो ग्रुपचे सीएमडी प्रदीप राठोड, गोरेगाव स्पॉट्स क्लब अध्यक्ष डॉ. विनय जैन आदींची उपस्थिती होती.
पीयूष गोयल म्हणाले की, सरपंच, आमदार ते मुख्यमंत्री असा प्रवास भजन लाल शर्मा यांचा आहे. आमच्या नेतृत्वाचे मेहनती, प्रामाणिक आणि सरळ व्यक्तिमत्त्व हेच आमच्या ताकदीचे कारण आहे. भाजपसारख्या पक्षातच असे सक्षम नेतृत्व घडते.
पीयूष गोयल पुढे म्हणाले की, पाण्याचा रिसायकल करून पुनर्वापर करण्याचे तंत्र विकसित करून आम्ही स्वच्छता आणि पर्यावरणपूरक विकासावर भर दिला आहे. झोपडपट्टीवासियांचे पुनर्वसन करण्याचे आमचे धोरण ठाम आहे, तर बाहेरच्या लोकांचे अनियंत्रित स्थलांतर थांबवून उत्तर मुंबईच्या स्थिरतेसाठी महत्त्वाची पावले उचलली जातील.
कोविड काळात देशातील कोणत्याही गोष्टीची कमी पडू दिली नाही. प्रत्येक महिन्याला अन्न वाटप करून एकही माणूस उपाशी राहिला नाही. तेव्हा देश सुरू ठेवणारे आणि सर्वांसाठी आधारभूत बनलेले सरकार महायुतीचेच होते. भारताचा विकासदर वेगाने वाढतो आहे. देशाच्या अर्थव्यवस्थेला आणखी गती देण्यासाठी महायुती सरकारचे योगदान महत्त्वाचे आहे. महाराष्ट्र व देशाला नंबर 1 वर ठेवायचे असेल, तर महायुतीला विजयी करणे गरजेचे आहे, असेही पीयूष गोयल यांनी सांगितले.
राजस्थानच्या मातीचा सुगंध तुम्ही सर्वदूर पसरवला आहे. शिक्षण, आरोग्य आणि सामाजिक क्षेत्रात आपल्या लोकांनी उल्लेखनीय कामगिरी केली आहे. निवडणुकीच्या वेळी काँग्रेस अफवा पसरवण्याचे काम करते. सीएएचा विरोध आणि आतंकवाद्यांना सहकार्य करणे, हे काँग्रेसचे धोरण राहिले आहे. त्यामुळे काँग्रेसपासून सावध राहा. राजस्थान सरकारने 11 महिन्यांत संकल्प पत्रातील अनेक कामे पूर्ण केली आहेत. भाजप सरकारने दिलेली आश्वासने नेहमी प्रामाणिकपणे पूर्ण केली आहेत. महाराष्ट्र आणि मुंबईचा विकास अधिक गतीने करण्यासाठी ‘डबल इंजिन’ सरकारची नितांत आवश्यकता आहे.
ठाकरे सरकारच्या ढिसाळ कारभारावर टीका
ठाकरे यांच्या काळात अनेक महत्त्वाचे प्रकल्प थांबले होते. पण आज, महायुतीच्या सक्षम नेतृत्वाखाली मेट्रो प्रकल्प, आकुर्ली रस्ता, मालाड सब वे या प्रकल्पांचे काम झाले. तर भाईंदरपर्यंत कोस्टल रोड यासारखे प्रकल्प मार्गी लागत आहेत. कोस्टल रोडमुळे व्यापाराला चालना मिळेल आणि उत्तर मुंबईतील रोजगाराच्या संधी वाढतील.
मतदारांना आवाहन
उत्तर मुंबईच्या मतदारांनो, तुम्ही संपूर्ण भागाची ताकद बदलू शकता, अशी क्षमता तुमच्यात आहे. तुमच्या मतांनी महाराष्ट्र व देशाच्या विकासाला गती मिळेल. महायुतीला विजयी करून पंतप्रधान नरेंद्र मोदींचे हात मजबूत करा आणि आपल्या भागाचा सुनियोजित विकास घडवून आणा, असे आवाहन पीयुष गोयल यांनी केले.