मुंबई / प्रतिनिधी : नियमबाह्य ड्रेस कोडचा निर्णय लादणाऱ्या चेंबुर ट्रॉम्बे एज्युकेशन सोसायटी संचालित एन जी आचार्य महाविद्यालयावर त्वरित कार्यवाही करण्याचे मागणी करणारे लेखी पत्र माजी मंत्री व महाराष्ट्र प्रदेश कॉँग्रेस कार्याध्यक्ष मो आरिफ (नसीम) खान यांनी राज्याचे मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडनवीस आणि श्री. अजित पवार यांना लिहिले.
नसीम खान यांनी आपल्या पत्रात म्हटले की, महाराष्ट्र राज्य हे पुरोगामी विचाराचे राज्य असून संविधानात व्यक्ती स्वतंत्र आणि शिक्षणाचा मौलिक अधिकार राज्यघटनेने समाजातील प्रत्येक जाती जमातीला दिलेला आहे. असे असूनही मुंबई उपनगरातील चेंबुर येथील चेंबुर ट्रॉम्बे एज्युकेशन सोसायटी संचालित एन जी आचार्य महाविद्यालयाने शिक्षण विभागाचा ड्रेस कोडबाबत कोणताही नियम नसताना नियमबाह्य पद्धतीने 11 वी व 12 वीच्या वर्गात शिकणाऱ्या विद्यार्थिनिना ड्रेस कोड घालण्याचा निर्णय जाहीर केला आहे. महाविद्यालयांच्या या निर्णयामुळे अल्पसंख्याक समाजातील बुरखा घालून येणाऱ्या विद्यार्थिनिना महाविद्यालयात प्रवेश करतेवेळी अडविण्यात येत असल्यामुळे लोकांमध्ये तीव्र असंतोष निर्माण झाला आहे. एका बाजूला केंद्र सरकारने देशात “बेटी बचाओ…. बेटी पढाओ” धोरण स्विकारले आहे आणि दुसऱ्या बाजूला राज्यात जर अशा प्रकारची घटना होत असेल तर अल्पसंख्याक मुलीना शिक्षणापासून वंचित करण्याचा कट असल्याचे दिसून येत आहे. महाविद्यालयांच्या अशा कृतीमुळे संविधानाच्या मूलभूत अधिकारचे हनन होत असल्याचा आरोप नसीम खान यांनी केला आहे. नसीम खान यांनी मागणी केली आहे की. एन जी आचार्य महाविद्यालय, प्राचार्य आणि चेंबुर ट्रॉम्बे एज्युकेशन सोसायटीच्या व्यवस्थापकीय मंडळावर तात्काळ कार्यवाही करावी आणि नियमबाह्य पद्धतीने जाहीर केलेला निर्णय त्वरित रद्द करावा.