- बाल हक्क आयोगाच्या अध्यक्षा अॅड. सुशीबेन शहा यांनी पोलिसांना खडसावलं
- गोवंडी येथील पारधी समाजाच्या मुलांनाच्या प्रकरणाची सुनावणी
प्रतिनिधी, मुंबई
गोवंडी परिसरातील पारधी समाजाच्या अल्पवयीन मुलांनी चोरी केल्याच्या संशयावरून शिवाजीनगर पोलिसांनी या मुलांना ताब्यात घेत रात्रभर पोलीस स्टेशनात डांबल्याचं प्रकरण नुकतंच समोर आलं. या प्रकरणात संबंधित मुलांना पोलिसांनी मारहाण केल्याचा आरोप काही सेवाभावी संस्था आणि मुलांच्या पालकांनी केला. या प्रकरणाची दखल घेत बाल हक्क संरक्षण आयोगाच्या अध्यक्षा अॅड. सुशीबेन शहा यांनी शिवाजीनगर पोलीस, बाल कल्याण समिती, जनहक्क संरक्षण समिती, चाईल्ड लाईन या सेवाभावी संस्थांसह या प्रकरणातील पीडित बालकांच्या पालकांनाही सुनावणीसाठी बोलावलं. लहान मुलांच्या हातून गुन्हा घडला असेल, तरी त्यांना पोलीस स्टेशनात डांबणं, मारहाण करणं या गोष्टी खपवून घेणार नाही, अशी कठोर भूमिका घेत अॅड. सुशीबेन शहा यांनी पोलिसांना चांगलंच धारेवर धरलं.
प्रकरण काय?
८ मार्च रोजी गोवंडी येथील एका महिलेच्या पर्समधील ६३ हजार रुपयांची रोख रक्कम चोरीला गेली. या महिलेने शिवाजीनगर पोलिसांत तक्रार दाखल करत आपल्याभोवती काही भिकारी मुलं घुटमळत होती, असं नमूद केलं. सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे पोलिसांनी पाच मुलांना जवळच्या पारधी वस्तीतून उचलून पोलीस स्टेशनला आणलं. ही सर्व मुलं ११ ते १५ वयोगटातील, म्हणजेच अल्पवयीन आहेत. लहान मुलांना पोलीस स्टेशनमध्ये चौकशीसाठी आणू नये, रात्री पोलीस स्टेशनात थांबवू नये, असे निर्देश असताना त्यांचं उल्लंघन झालं. याबाबत बाल कल्याण समितीला माहिती मिळाल्यानंतर त्यांनी पोलीस स्टेशनात धाव घेतली. तक्रारदार महिलेने या पाच मुलांची ओळख पटत नसल्याचं सांगूनही पोलिसांनी या मुलांना डांबून ठेवत मारहाण केली. त्यापैकी ११ वर्षांच्या एका मुलाला पोलिसांनी रात्रभर कोठडीत ठेवलं. तसंच पोलीस संबंधित मुलांच्या पालकांच्या घरी जात त्यांच्यावर दबाव टाकत असल्याचा आरोपही पालकांनी केला आहे. तसंच एका पोलीस कर्मचाऱ्याने एका अल्पवयीन मुलीला तिच्या कपड्यात पैसे लपवले आहेत अथवा नाही, हे दाखवण्यासही सांगितल्याचा गंभीर आरोप आहे.
बाल हक्क संरक्षण आयोगाचं म्हणणं काय?
या सुनावणीसाठी अतिरिक्त पोलीस महासंचालक दीपक पांडे, शिवाजीनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बापूराव देशमुख उपस्थित होते. बाल हक्क संरक्षण आयोगाच्या अध्यक्षा अॅड. सुशीबेन शहा यांनी या प्रकरणी पोलिसांना समज देत कोणत्याही परिस्थिती बालकांच्या हक्कांचं उल्लंघन होणार नाही, याची काळजी घेण्याचे निर्देश दिले. कोणतंही मुल जन्मत: गुन्हेगार नसतं. परिस्थितीमुळे ते तसं होतं. ही परिस्थिती बदलण्याची जबाबदारी समाजातील प्रत्येक घटकाची आहे, असं अॅड. सुशीबेन शहा म्हणाल्या.
पुढे काय?
या प्रकरणी पोलिसांकडून घडलेल्या गैरप्रकारांची सखोल चौकशी व्हावी आणि संबंधित पोलीस कर्मचाऱ्यांवर कारवाई करावी, अशी मागणी करणारं विस्तृत पत्र अॅड. सुशीबेन शहा अतिरिक्त पोलीस महासंचालक दीपक पांडे यांना देणार आहेत. सात दिवसांच्या आत ही चौकशी पूर्ण करून त्याचा अहवाल सादर करण्यात यावा, असं पोलिसांना सांगितलं जाईल, अशी माहिती अॅड. शहा यांनी दिली.