शिक्षणमंत्र्यांकडे केली मागणी
- नंदुरबार व इतर राज्यांमध्ये साखर शाळा त्वरीत चालू करा
राज्यातील अनेक ऊसतोड कामगार ऊसतोडीसाठी नंदुरबारसह इतर जिल्ह्यात स्थलांतर करतात. यावेळी कामगारांचे संपूर्ण कुटुंब हे गाव सोडत असतं. त्यामुळे मजुरांच्या मुलांच्या शिक्षणाचा प्रश्न उपस्थित होतो. मुलांना शिक्षण मिळावे, यासाठी कायद्यानुसार जिल्हा परिषदेने साखरशाळांच्या माध्यमातून ऊसतोडणी कामगारांच्या मुलांसाठी शिक्षणाची दारे उघडली आहेत. मात्र, अजूनही काही जिल्ह्यात साखर शाळा सुरू झालेल्या नाहीत. यावर आ. सत्यजीत तांबेंनी शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांच्याकडे ऊसतोड कामगारांच्या मुलांसाठी त्वरीत ‘साखर शाळा’ सुरू करावी, अशी मागणी केली आहे.
ऊसतोड कामगारांच्या पुढच्या पिढीच्या हातात पुन्हा कोयता येऊ न देणे, याची जबाबदारी घेणे हे सरकारचे कर्तव्य आहे. क्रांतीज्योती, समाजसुधारक सावित्रीबाई फुले यांनी महिला, वंचित आणि बहुजन समाजातील मुलांच्या शिक्षणासाठी अतोनात यातना सहन केल्या. त्यांच्या जयंतीदिनी सर्व साखर शाळा सुरू करण्याची मागणी सरकारकडे करताना अतोनात वेदना होत आहेत. कारण शासनाने हे पाऊल स्वतःहून उचलायला हवे होते, अशी माहिती आमदार सत्यजीत तांबेंनी दिली.
जिल्ह्यात साखर शाळा सुरू न झाल्यामुळे ऊसतोड कामगारांच्या मुलांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. आम्ही ऊस तोडून कुटुंबाचे पोट भरतो. तसेच आमची मुलं भविष्यात ऊस तोडणार का? असा सवाल ही ऊसतोड मजुरांनी केला आहे. शिक्षण हा प्रत्येकाचा हक्क आहे. या ऊसतोड मजुरांच्या मुलांना सुद्धा शिकण्यासाठी साखर शाळा सुरू करणे गरजेचे आहे. शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी नंदुरबार व राज्यात सर्वच ठिकाणी शाळा सुरू करण्याच्या दृष्टीने आवश्यक पावलं तातडीने उचलावी, अशी मागणी आ. सत्यजीत तांबेंनी केली आहे.