- पुण्यात शिक्षण आयुक्त, प्राथमिक व माध्यमिक विभागांसोबत चर्चा
- भरती प्रक्रियेचा प्रश्नही उपस्थित
पुणे:शिक्षण क्षेत्रातील विद्यार्थी, शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी यांच्या प्रश्नांना सातत्याने वाचा फोडणाऱ्या आ. सत्यजीत तांबे यांनी बुधवारी पुण्यात शिक्षण आयुक्तांसोबत बैठक घेतली. या बैठकीत प्रलंबित भरती प्रक्रियेसोबत प्राथमिक आणि माध्यमिक विभागाच्या प्रश्नांवर चर्चा झाली. हे प्रश्न तातडीने सोडवण्याचे निर्देश आ. तांबे यांनी या वेळी दिले.
पुण्यातील शिक्षण आयुक्तांच्या कार्यालयात पार पडलेल्या या बैठकीत शिक्षण आयुक्त सुरज मांढरे, माध्यमिक विभागाचे शिक्षण संचालक संपत सुर्यवंशी, प्राथमिक विभागाचे उपसंचालक कुलाळ, पुणे विभागाचे शिक्षण उपसंचालक प्रवीण अहिरे आणि इतर अधिकारी उपस्थित होते.
अनेक संस्थांमध्ये शिक्षकांची किंवा शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची पदे रिक्त आहेत. अशा संस्थांना जाहिरात काढून भरती प्रक्रिया राबवण्याची परवानगी द्यावी, या प्रमुख मागणीवर या बैठकीत चर्चा झाली. तसंच ज्या प्रमाणे अर्धवेळ शिक्षक पूर्णवेळ होताना त्यांनी अर्धवेळ पदी असताना केलेली सेवा ग्राह्य धरतात, त्याचप्रमाणे ग्रंथपालांची अर्धवेळ सेवाही ग्राह्य धरावी. त्यासाठी ७ नोव्हेंबर २०२३ त्या शासन निर्णयाचा आधार घ्यावा,२००५ पासून सेवेत असलेल्या ग्रंथपालांना जुन्या पेन्शन योजनेचा लाभ व्हावा, या प्रमुख मागण्यांवरही चर्चा झाली.