मुंबई व नवी मुंबईत लाखोंचा गुटखा, पान मसाला जप्त
मुंबई :राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री राजे धर्मरावबाबा आत्राम यांच्या निर्देशनानुसार
अन्न व औषध प्रशासनाने(एफडीए ) मंगळवारी मुंबईतील बोरिवली, परळ, दादर, जोगेश्वरी पश्चिम, मुलुंड पश्चिम येथे कारवाई करून १ लाख ७ हजार ४२० रुपयांचा गुटखा व पान मसाला जप्त केला असून याप्रकरणी ११ जणांना अटक करण्यात आली.
मुंबईमध्ये मोठ्या प्रमाणात गुटखा व पान मसालाची बेकायदा विक्री होत असल्याच्या अनेक तक्रारी अन्न व औषध प्रशासनाकडे आल्या होत्या. या तक्रारींची दखल घेत अन्न व औषध प्रशासनाने मुंबई व नवी मुंबई शहरामध्ये धडक मोहीम हाती घेतली.
जोगेश्वरी पश्चिम येथील ओशिवरा परिसरातील ओशिवरा सुपारी स्टोरवर केलेल्या कारवाईमध्ये तब्बल ८१ हजार ७८ रुपयांचा पान मसाला व सुगंधित तंबाखू जप्त करण्यात आला. तसेच तपासणीसाठी तीन नमुने घेण्यात आले. प्रतिबंधित पदार्थांची विक्री केल्याप्रकरणी दुकानाचा मालक मोहम्मद अली इर्शाद अहमद शेख याला अटक करण्यात आली. तसेच बोरिवली पश्चिमेकडील चामुंडा सर्कलजवळील गिरिजा स्टोर आणि रोकडिया लेन येथील गोकुळ पान शॉपवरही कारवाई केली. या कारवाईत ९ हजार १९६ रुपये किमतीचा गुटखा, पान मसाला व सुगंधित तंबाखू जप्त करण्यात आला. यातील १२ नमुने तपासणीसाठी घेण्यात आले. या दोन्ही दुकानाच्या मालकांविरोधात गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्यात आली.
त्याचप्रमाणे परळ एस. टी आगराजवळील दुबे पान शॉप आणि दादर पश्चिम येथील बी. एस. रोडवरील किरण पान बिडी शॉपवर कारवाई करण्यात आली. या दुकानांतून ९ हजार १४२ रुपये किमतीचा गुटखा, पान मसाला व सुगंधित तंबाखू जप्त करून २० नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आला. या दोन्ही दुकानांच्या मालकांविरोधात गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्यात आली.
मुलुंड पश्चिम येथील महाकाली पान शॉप, साई पान शॉप, शीव पान शॉप, साची पान शॉप, रानु उपाध्याय पान बिडी शॉप आणि राजेश जेठालाल हॅण्डक्राट या दुकानांवरही कारवाई करण्यात आली. या दुकानांमधून २८ नमुने तपासणीसाठी घेण्यात आले. तसेच ८ हजार ४ रुपयांचा गुटखा, पान मसाला व सुगंधित तंबाखू जप्त करण्यात आला. तसेच सहाही दुकान मालकांविरोधत गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्यात आली.
तसेच नवी मुंबई एपीएमसी भाजीपाला मार्केटमधील पान टपऱ्यांवर कारवाई करण्यात आली आहे. या कारवाईत चार जणांना ताब्यात घेण्यात आले असून त्यांच्या दुकानात सापडलेला हजारो रुपये किमतीचा प्रतिबंधित गुटखा, पानमसाला आणि इतर तंबाखुजन्य पदार्थ जप्त करण्यात आले आहेत. शिवाय, या टपऱ्याही सील करण्यात आल्या आहेत.
अन्न व औषध प्रशासनाने पोलिसांच्या मदतीने ही कारवाई केली.