कष्टाने दीड हजार रुपयांचे दहा हजार करणाऱ्या लाडक्या बहिणीचे मुख्यमंत्र्यांनी केले कौतुक

0
4

शासनाच्या मदतीने महिलांचे आयुष्य बदलू शकते, मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांनी व्यक्त केल्या भावना

मुंबई:शासनाच्या दीड हजारांच्या मदतीत काय होऊ शकते, अशी शंका उपस्थित करणाऱ्यांना प्रणाली बारड या लाडक्या बहिणीने चोख उत्तर दिले आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत मिळालेल्या दीड हजार रुपयांच्या भांडवलावर तब्बल दहा हजारांची कमाई बरड यांनी केली. वर्षा निवासस्थानी बोलावून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या लाडक्या बहिणीचे विशेष कौतुक केले.

काळाचौकी इथं राहणाऱ्या प्रणाली बारड यांनी गणेशोत्सवातील समय सूचकता दाखवून आरतीवेळी वापरात येणाऱ्या हस्त घुंगराचा व्यवसाय केला. समाजमाध्यमवरही त्याची त्यांनी जाहिरात केली. केवळ दीड हजाराच्या भांडवलात त्यांनी मोजक्या दिवसात दहा हजार रुपयांची कमाई केली.

प्रणाली कृष्णा बारड यांनी शुक्रवारी वर्षा निवासस्थानी येऊन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. यावेळी त्यांच्यासोबत सहकारी साईराज परब हे देखील सोबत होते. बारड यावेळी म्हणाल्या की, मुख्यमंत्री साहेबानी स्वतः माझ्याजवळील घुंगरू विकत घेऊन माझे मनोबल वाढवले आहे. लाडक्या बहिणींना माझे सांगणे आहे की, मिळालेल्या पैश्यांचा सदुपयोग करून आपली मिळकत वाढवता येऊ शकते. तसेच आपल्यातली कला आणि कौशल्य यासह समाजमाध्यमाची साथ घेतली तर नक्कीच एखादा व्यवसाय यशस्वी होऊ शकतो. महिलांच्या सक्षमीकरणासाठी शासन चांगली पावले उचलत असून यामुळे महिलांना आधार मिळालाय. यावेळी मुख्यमंत्री शिंदे यांनी प्रणालीने दाखवलेल्या कष्टाचे आणि समय सूचकतेचे तोंड भरून कौतुक केले. महिलांनी अशाचप्रकारे शासनाने दिलेल्या मदतीचा सदुपयोग करून एखादा छोटा व्यवसाय करण्यासाठी केला तर अनेक महिलांचे आयुष्य बदलू शकेल, असे मत यावेळी मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केले.

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना महायुती सरकारची अत्यंत महत्त्वाकांक्षी योजना ठरली आहे. या योजनेतून लाडक्या बहिणींना मिळालेल्या पैशातून अनेक महिलांना घरगुती अडचणी सोडवण्यास मदत झाली आहे. तसेच कित्येक महिलांनी आपले छोटे छोटे भांडवल तयार करून संसाराला हातभार लावणाऱ्या घरगुती व्यवसायाची मुहूर्त मेढ रोवली असल्याचे दिसून येत आहे. काही जण असे म्हणत होते की 1500 रुपयात नक्की काय होऊ शकते त्याचे उत्तर प्रणाली बारड या लाडक्या बहिणीने दिले असल्याचे मत यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी माध्यमांशी बोलताना व्यक्त केले आहे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here